शाळा पुराण

 शाळा पुराण... अथपासून इतिपर्यंत  

मागच्या आठवड्यात, लेकीच्या शाळेत निरोप समारंभ होता. आणि त्याची लगबग तर किती.. काळी ट्रेण्डी साडी (ती काकूबाई जरीसरी ची नाही हा) ब्लॉउज, केशरचना आणि काय काय..तीन वर्षांची गोंडस चिमुरडी ते दहावी कित्ती मोठा काळ शाळेत व्यतीत झाला.. तिचा आणि त्या अनुषंगानी आमचाही.. तेरा वर्ष एकाच शाळेत तिच्या बरोबरचे अनेक सवंगडी एकमेकांबरोबर शिकत भांडत मस्ती करत मोठी होत आता एकदम साड्यामध्ये मुली आणि टाय ब्लेझर मधली एकदम मोठी झालेली मुलं आयुष्याच्या एका मुख्य टप्प्यावर उभे आहेत. का कोण जाणे मन अगदी हळवं झालं आणि अगदी स्वैरपणे भूतकाळात चक्कर मारून आलं. कित्ती कित्ती त्या आठवणी.. 

ह्या अश्या नर्सरी ते दहावी प्रवासाची सुरुवात तर फार फार मजेशीर आहे बरका... 

तर २०१० चा नोव्हेंबर डिसेंबर महिना.. सगळीकडे शाळेच्या ऍडमिशनचे फॉर्म मिळण्याची लगबग.. काही शाळेत तर पहाटे पहाटे ४ - ४. ३० वाजल्यापासून कुडकुडणाऱ्या थंडीत (पूर्वीच पुणे राहिला नाही हो आता 😜)लाईन मध्ये उभे राहून फॉर्म मिळण्याचे ते दिवस.. तेव्हा इंटरनॅशनल स्कूल्स CBSE / ICSE ची कोथरूड मध्ये तरी चलती नसलेले दिवस. घराजवळच्या ४-५ शाळा मनात ठरवून आम्हीही ह्या लगबगीचा भाग झालो. 

तर पहिला फॉर्म भरण्याचा टप्पा पार करून दुसरा टप्पा म्हणजे गोंडस नाव असलेली शाळाभेट आणि काही ठिकाणी तर पालकांची चार चार पानांची परीक्षा...

ह्यात पहिला नंबर लागला अभिनव शाळेचा.. नुसत २.५ वर्ष्याच्या मुलांना बघून काय ठरवलं काय माहित पण नकार आला.. मग नंबर लागला बालशिक्षण शाळेचा.. तिथे पालकांचे चार चार पानांची परीक्षा आणि नंतर ६०००० हा डोनेशन चा आकडा ... नैतिकता आणि शाळेकडूनच्या अपेक्षा वगैरे फक्त परीक्षेपुरत्याच आणि पालकांनाच.. हे मात्र हपापलेले पैशासाठी.. मिळाली असती तरी नसती घेतली मी ऍडमिशन.. मग आल New India School ते फक्त ३१ मे पर्यंत जन्मलेल्यानाच प्रवेश देत आणि माझी लेक जून पहिल्या आठवड्यातली.. झाल फॉर्मच नाही मिळाला काय दोष आमचा😃मग Millenium National School (तेव्हा शाळा SSC बोर्डचीच होती) आतापर्यंत नकार पचवायची सवय झाली असल्याने इथे काही फारसी आशा नव्हती तर ऍडमिशन प्रतीक्षा यादीमध्ये ... झाल आता आमचा पूर्ण भरोसा सेवासदन शाळेवर होता..पहाटे ४ पासून लाईन मध्ये उभे राहून फॉर्म तर मिळवला होता. 

पण पण..

नेमकी सेवासदनच्या पालकांच्या टेस्टची आणि मुलांच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ माझ्या आत्ये दिराच्या लग्नाच्या दिवशीचीच.. पण नशीब चांगलं कि लग्न मेहेंदळे गॅरेजलाच (मनोहर मंगल कार्यालय पूर्वीचे आताचे वऱ्हांडा हॉटेल) होते.. शाळेच्या अगदी जवळ.. पण लग्नाचा मुहूर्त  आणि परीक्षेची वेळ एकच..अगदी कपडे बदलून शाळेत जायला पण वेळ नव्हता.. झालं गेलो तसंच.. मुलीला तेवढं फॉर्मल कपडे घालून.. तिथे तर भलतीच तऱ्हा बरका मंडळी.. एका वर्गात आई पेपर लिहितेय एका वर्गामध्ये बाबा लोक आणि तिसऱ्या वर्गामध्ये चिमुकली एकमेकांना न ओळखणारी मंडळी आणि काही खेळणी रंगखडू आणि कागद.. आणि पेपर तो काय मुलांच्या सवयी, पालकांच्या सवयी, मुलांच्या बद्दल तुमची जडणघडणाची व्याख्या.. काय काय नव्हत.. पोरगी तर पार कंटाळून गेली तासभर एकटी राहून आणि १२. ३० वाजले तशी भुकेने हैराण झाली. ह्या सगळ्या नंतर मुख्याध्यापिकेशी मुलाखत त्यात आई वडील आणि संभाव्य विद्यार्थिनी.. आधीच कावलेलं ते लेकरू.. एकारांत sophisticated मुख्याध्यापिका.. आम्हाला लग्नाच्या कपड्यात बघूनच तिच्या चेहऱ्यावर माया साराभाई लुक आला अगदी Sooo Middleclass Kind You Know 😃तिथेच लक्ष्यात आलं आम्हाला.. पण त्यावर कडी म्हणजे वैतागलेल्या, भुकेलेल्या कन्येला त्यांनी नाव विचारल्यावर तिनी जे भोकाड पसरलं कि बस्स.. मग तिला शांत करण्यासाठी त्यांनी चॉकोलेट दिलं तर मॅडमना आणखीच राग आला पोळीभाजी वरणभात जेवायच्या वेळेला ह्या छोटंसं चॉकोलेट देतायेत.. दिलं तिनी ते भिरकावून त्यांच्याच अंगावर.. झालं आम्ही बाहेर पडून मस्तपैकी लग्नाचं सुग्रास जेवण जेवलो जाऊन आणि सेवासदन हा विषय कायमचा संपला.. आता कुठेतरी खटपट करून ऍडमिशन घेऊन टाकू असा विचार करून Children's Paradise ला ऍडमिशन घेऊन मोकलो झालो पण ती शाळा चौथी पर्यंतच होती..म्हणून शोध सुरूच ठेवला. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जानेवारी एन्ड ला आमच्या शाळेचे फॉर्म्स मिळाले आणि लकी ड्रॉ पद्धतींनी प्रवेश मिळतील असं कळलं.. बघूतरी नशीबच अजमावून (परीक्षा देऊन नापासच होत होतो 😁)असा विचार करून फॉर्म भरला. आणि लकी ड्रॉ मध्ये १५० मध्ये शेवटून ३१ वा नंबर लागला आणि हुश्श झालो.. हीच ती शाळा असा झाल आम्हाला आणि आम्ही प्रवेश निश्चित केला. 

And came June २०११.. तीन वर्ष पूर्ण कन्या नर्सरी मध्ये जायला लागली.. छोटीशी गुलाबी रंगाची बास्केट, डब्बा आणि पाण्याची बाटली घेऊन.गोरी गोरी कुरळ्या केसांची गोडुली. पहिल्या दिवसापासून ही शाळा आणि तिच्या सर्व शिक्षिका तिला फार आवडल्या .. कधीही न रडता मजेत जात असे.. हळू हळू शाळेतली छोटी मंडळी एकमेकांना ओळखू लागली रुळू लागली.. गप्पा गाणी अक्षरओळख, डब्बा खादाडी, श्लोक आणि पाढे पाठांतर, स्नेहसंमेलन,  field trip सगळं सगळं अनुभवत मोठी होऊ लागली..त्यांचे ग्रुप बनायला लागले. शाळेत साजरे होणारे सण उत्सव, आज्जी आजोबा दिवस ह्या सगळ्यातून नकळत भारतीय संस्कृती आणि संस्कारांची ओळख झाली. हातावर मिळालेले स्टार घरी येऊन दाखवण्यात मोठ्ठी मज्जा वाटायची तिला न आम्हालापण ..शॉर्या धायबरचं चावणं निलच  बोचकारण अश्या छोट्या कुरबुरीही असत. नर्सरी जुनिअर आणि सिनिअर ची तीन वर्ष भुर्रकन उडून गेली. टीचर ची लाडकी असल्यामुळं Best KG student च बक्षीस पण मिळालं होत.. सगळी मुले मोठ्या वर्गात पहिली मध्ये दाखल झाली. बरीचशी तीन वर्षांपासून ओळखीचीच असल्यानी वेगळं असं कोणी नव्हतं फक्त शाळेची वेळ बदलली होती आणि आता सकाळी ७ ते १२. १५ अशी झाली होती. कन्येने पुढील दहा वर्षात एकही दिवस सकाळी लवकर उठायला आणि अंघोळ करून तयार होऊन जायला कधीच काचकूच केली नाही हे खरंच कौतुकास्पदच..नकळत एक सकारात्मक ऊर्जा जरूर होती शाळेच्या वातावरणामध्ये.. 

शाळा आपल्या समाजाचा आपण एक भाग आहोत याची जाणीव मनात जागी ठेवत शिक्षण देते. शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नक्कीच असं वातावरण आणि सोई उपलब्ध होत्या ज्यामुळे विद्यार्थी कोठेही गेलं तरी त्याला सहजगत्या सामावता येत.. ह्या शाळेच्या बाबतीत हि हे खरंच होता.. अतिशय जुना प्रवीण असा शिक्षकवर्ग, मामा,मावश्या आणि वॅन ड्राइवर श्रीपती काकांमुळे व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये खूप मोलाचा वाटा उचलला.  

कुठल्याही स्पर्धेमध्ये बिनधास्त नाव देऊन येत असे.. बक्षीस मिळो न मिळो ती भाग घेत असे. प्लास्टिक कलेक्शन मध्ये तर सगळ्यात जास्ती प्लास्टिक देऊन अनेकदा बॅज मिळवला होता.. ह्यातूनच घरातला प्लास्टिक वापर अतिशय विचारपूर्वक होऊ लागला, वळण लागल. मैत्रिणीची (धनश्री) आई घरी नसल्यामुळं ती डब्बा आणत नसे काही दिवस तर मुलगी तिला स्वतःचा डब्बा देऊ लागली. हे शहाणपण घरी राहून शिकून नक्कीच नव्हतं आल. एकुलत्या एक मुलांना sharing and caring चा प्रॉब्लेम असतो हा मुद्दाच तिनी खोडून काढला.. 

सगळं सुरळीत चाललं असताना अचानक हा दळभद्री कोरोना येऊन उभा ठाकला आणि मुलांचं सहजीवन बोंबललं.. इंटरनेटच्या गोंधळून टाकणाऱ्या अनाकलनीय जाळ्यामध्ये सगळेच अभिमन्यू चक्रव्युहामध्ये गुंतला तसे गुंतत गेले. आणि teenage ची (सातवी आणि आठवी)सुरुवातच एका बंद खोलीतल्या शिक्षणाने झाली. खूप खूप नुकसान झालं मुलांचे नक्कीच..सगळं सुरळीत व्हायला परत रुळावर यायला आठवीच दुसरं सत्र गेले. 

मुलांची लिहायची सुटलेली सवय, घरात एकटं राहण्याची सवय, मोबाईलच्या वाढत्या वापराची सवय सगळं सगळं एकदम बंद करून शाळेत मिसळणं तसं त्या वयाला फार फार आव्हानात्मकच होत. पण शाळेत गेल्यावर जणू काही झालंच नव्हते मधल्या काळात इतकी पटकन मुलं रुळली. 

शाळेच्या विजयी बँड पथकात/ स्नेहसंमेलनामध्ये बासरी वादन, गायन (अजून आठवतेय घाशीराम कोतवाल मधली नांदी), आयुका आणि आयसर सारख्या अत्युच्च संस्थांमध्ये प्रकल्प सादर करण्याची आणि बक्षीस मिळवण्याची संधी शाळेमुळेच मिळाली. सगळं सगळं डोळ्यासमोर तरळलं... 

तर अशी नर्सरी पासून १३ वर्ष बरोबर असलेली मुलंमुली  ऋजुता, अपूर्वा, अर्णवी, धनश्री, ओजसी, इशिका, इशिता, राजस, अनय, निधी, आर्यन, मिहिका,रक्षित, केतकी, सगळ्यांची नावं नाही लिहिता येणार इथे पण सलग १३ वर्ष एकाच शाळेत बऱ्याच संखेनी शाळा न बदलता राह्यली ह्यातच शाळेचं सर्वांगीण विकास घडवण्यातलं स्थान दिसून येत.  

सर्व मुलांना ग्रुप फोटो काढून memories create करताना बघून आम्हा आयांना खरंच भरून आलं होत... सर्वाना दहावीच्या परीक्षेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. 

अशी शाळेशी असलेली गुंफण परवा झालेल्या निरोप संमारंभामुळे निसटून जाईल पण मुलांचे एकमेकांशी आणि शिक्षकांशी असलेले ऋणानुबंध तसेच राहतील. शाळेनं काय दिल हे काय सुधारणा केली पाहिजे ह्यापेक्षा निश्चितच तराजूच्या पारड्यात वरच्या दर्जाचं आहे. सर्वगुणसंपन्न कोणीच नसत..

तर माझी मुलगी त्याच शाळेमध्ये होती जी शाळा गेल्या आठवड्यामध्ये social media वरच्या एका वाईट पोस्ट मुळे गाजत होती... वाईट/नकारात्मक गोष्टी social media मध्ये लगेच catchy होतात असो.. शाळा छानच आहे.. वाईट प्रवृत्ती ठेचली पाहिजे ..  

परांजपें स्कूल पुणे     

 शाळा पुराण सफळ संपूर्ण ..😊😊😊    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Bosch Dishwasher Review and Buying guide

माझी आजी ..