पाध्ये काका ...श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये

 साधारण ९५-९६ ची गोष्ट.. नाशिक ला गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणा ची चळवळ वैनतेय संस्थेने सुरु करून ८-१० वर्ष झाली होती आणि आता ती छान फोफावली होती. मी, माझी बहीण समीरा असे काही ओळखीच्या लोकांच्या (या मध्ये प्रामुख्याने ओक काका (शंतनू ओक चे वडील ), चिन्मय पर्वते आणि निशांत खरे ) संपर्काने सामील झालो. वैनतेय ची महिन्या तुन एकदा सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास पेठे हायस्कूल ला मीटिंग असायची. त्यामध्ये झालेल्या ट्रेक चा आढावा आणि पुढील ट्रेक ची आखणी हया  महत्वाच्या गोष्टी असत. आणि नवीन  सभासदांची ओळख असत असे. मीटिंग संपल्यावर एक उंच गोरेपान गृहस्थ जवळ आले आणि चिन्मयनी त्यांची ओळख करून दिली. हे पाध्ये काका... त्यानंतर त्यांनी स्वतः my pleasure .. मी श्रीनिवास त्रिविक्रम पाध्ये असून पंजाब नॅशनल  बँकेमध्ये नोकरी करतो अशी ओळख करून दिली. आणि बघता क्षणी तुझे डोळे खूप च छान आहेत ते बघून च तू खूप हुशार असणार आणि मी भाग्यवान आहे अश्या मोठ्या लोकांची ओळख झाल्यामुळे असा एकदम बोलून खुश करून टाकल. 

पाध्ये काकांनी वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण या नाशिकच्या संस्थेसोबत, १९९४-९५ पासून भरपूर पदभ्रमण केले होते. पण आम्ही अगदीच नवीन होतो. मग हळू हळू वैनतेय मधल्याच लोकांचा आपला असा ग्रुप बनत गेला.  त्यामध्ये प्रामुख्याने पाध्ये काका, चिन्मय, निशांत,रेणू ,प्रणव टेम्बे,हेमंत पोखरणकर/देशमुख ,मी समीरा असे जोडले गेलो. एकमेकांच्या घरी जाऊन गप्पा टप्पा , मुख्य म्हणजे भटकंती होऊ लागली. आणि काका उलगडू लागले. 

रत्नागिरी च्या नाटे गावातील कोंकणी माणूस .. काका, नाशिक ला देवळाली कॅम्प ब्रँच मध्ये होते तेव्हा. पण कारकुनी आणि गणिती आकडेमोडीमध्ये न अडकता .. वृत्तपत्र  लेखन,प्रकाशचित्रण, निसर्गामधील भटकंती, वाचन,वनस्पती शास्त्र आणि जाण .. हिमालया ची  ओढ... लेह लडाख, स्पिती valley मधील अगणित भटकंती, चालणे आणि व्यायाम. 

माझी बहीण त्यांच्या बरोबर त्यांच्या गावी नाट्या ला आणि भाऊ हिमालयात जाऊन आले होते. तेव्हा कॉलेज मुळे मला जमल नव्हता. 

एखादे पुस्तक आवडले की आणून देणे व त्यावर चर्चा करायचे.... काढलेले फोटो सुंदर अश्या अल्बम मध्ये जतन करणे हाही एक छंद .. चांगले चांगले पदार्थ करून दुसऱ्याला खाऊ घालणे...त्यामध्ये काकूंची साथ..  कित्ती तरी चांगल्या गोष्टी. सोनीं (त्यांची मुलगी) तिच्या चित्रकलेच कौतिक करणारे बाबा तर सॅग्गी (मुलगा) ह्यांनी वाट वाकडी  करू नये म्हणून कडक बाबा..स्पष्टवक्तेपणा हा कोकणी माणसाचा स्थायीभाव च ..        

प्रकाशचित्रण करण्यासाठी लागणारा सर्वोत्तम कॅमेरा, निकॉन आणि  ५०mm, ७०mm लेन्सेस तेव्हाच त्यांच्याकडे होत्या. 

त्यांच्या बरोबर केलेले ट्रेक्स आणि भटकंती म्हणजे 'उटवड' त्रंबकेश्वर जवळचा ट्रेक, शेरीच्या पाडयाला उतरून सुरु होतो. ह्या ट्रेक मध्ये चालतं त्यांनी झाडाची (सप्तपर्णी, बाभूळ)दिलेली माहिती अजूनही आठवते. सह्याद्रीच्या किंवा कुठल्याही विषयावर गप्पा रंगल्या की ट्रेकमधला थकवा जाणवत नसे. तसच एकदा दुगरवाडी धबधबा ट्रेक ला पण अशीच मज्जा आली होती. 

अजून एक आठवण म्हणजे त्यांचे bike भटकंती.. एकदा अचानक नाशिक जवळील गोरखचिंचेचा (बाओबाब )जुना आणि मोठे झाड बघायला ४०-४५km, ५-६ गाड्यांवर गेलो होतो आम्ही. 

त्यांनंतर मी शिक्षणासाठी पुण्याला आल्यावर थोडीशी नाशिक भ्रमंती कमी झाली पण नाशिक ला गेल्यावर कॅनडा कॉर्नर जवळच्या घरी नेहमी चक्कर व्हायची. कधी इडली सांबार, कधी सूप अशी मेजवानी.. आणि मी mechanical engg करतेय ह्याचा खूप कौतुक.. 

इंजिनीरिंग ला शेवटच्या वर्षात असताना, कॅम्पस प्लेसमेंट चे पहिले महत्वाचे दिवस सोडून मी लेह लडाख ला काका आणि चिन्मय बरोबर गेले होते १ जुलै - १७ जुलै २००० साली. नाशिक हुन पंजाब मेल नि दिल्ली आणि मग दिल्ली हुन चंदीगड, मनाली, रोहतांग, केयलोंग, पांग, सर्चू, कोकसार, करत लेह आणि तिथून पुढे लामायुरू moonlands ,कारगिल,द्रास, झोझीला पास, सोनमर्ग , श्रीनगर , पटनी टॉप, जम्मू, लुधियाना,दिल्ली असा सुंदर निसर्गरम्य प्रवास केल्यावर काका का हिमालयाच्या प्रेमात आहेत हे कळला. खूपच सुंदर detailed माहिती देत होते सगळीकडे आणि भरभरून बोलत. निसर्ग मित्र म्हणून हिमालयात अनेक वेळा जाऊन त्यालाही मित्र केले होते.

मी बंगलोर ला शिफ्ट झाल्यावर(२००१-२००६) थोडासा संबंध कमी झाला होता.पण माझ्या लग्नात आवर्जून आले होते. २००७-०८ नंतर कधीतरी त्यांनी पुण्याला ट्रान्सफर घेतली. आणि आमच्या परत गाठीभेटी होत होत्या. अगदी सोनीच्या लग्ना पासून सागर च्या मुलाच्या मुंजी पर्यंत. .. घरी हि येत असत. माझ्या मुलीला(२०१०-११ ती ३ वर्षांची होती तेव्हा ) एकदा वाटीत ओवा-जिरे-बडीशोप खातांना बघून  दुसऱ्यावेळी येताना ते अर्धा किलो लखनवी बडीशोप खाऊ म्हणून घेऊन आले होते... रविवार पेठेत जाऊन..

आणि आज बडीशोप भाजत असतानाच सागर चा फेसबुक भिंती वरचा काका आकस्मिक गेल्याचा निरोप वाचला. काय हा दुर्दैवी योगायोग ...  

तसाच एकदा दोन एक वर्षांपूर्वी लाहौल स्पिती ला गेले होते तेव्हा येताना एक्स्पोर्ट क्वालिटी किन्नोर ची ग्रीन अँपल आणली होती.

वाढदिवशी न विसरता काका फोन करून शुभेच्छा देत असत. तो नियम त्यांनी जुलै मध्ये माझ्या वाढदिवशी रात्री १०.३० ला लक्षात आल्यावर फोन करून ह्यावर्षी पण मोडला नाही.. कित्ती आठवणी .. 

शेवटची भेट म्हणजे पौड रस्त्याला चालताना फेब्रुवारी मध्ये भेटले होते तीच. व्यायामाची खूप आवड होती. रोज 10 k. M. फिरायचे... टेकडी वर पण जायचे. डाएट बाबतीत कॉम्प्रोमाइस नाही. घरी आले तरी त्यांना हवी तशीच कॉफी किंवा चहा बनवण्याच्या सूचना देत असत. 

सर्वोत्तम तेच घ्यायचे, आणि द्यायचे ,... दिलदार व्यक्तिमत्व .... दिलेला शब्द आणि वेळ कधीच चुकवली नाही. इतकं कि जन्म आणि मृत्यू ची पण १९ हि तारीख सारखीच..    

काका ... "तुमच्या बरोबर नाट्या ला जायचा राहून गेले" हि रुखरुख  कायम मनात राहील. 

वाचन , कला , भटकंती व निसर्गप्रेम यांतून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न वारसा म्हणून पुढे चालू ठेऊन आपले व्यक्तिमत्व बहुआयामी बनवणे हीच त्यांना श्रद्धांजली ... 

त्यांच्याच शब्दात सांगायचं झाला तर ... Happy to be friend's with you. It was nice meeting you. 

एक अवलिया .. मला ठाऊक असलेले पाध्ये काका.. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शाळा पुराण

Bosch Dishwasher Review and Buying guide

माझी आजी ..