Shala... MRSKVM... Part 1


तर मंडळी, 
काल म्हटल्याप्रमाणे मी आजपासून रोज शाळा आणि आयुष्याची वळणे, ह्या सदरातून काही गोष्टींचा पुन्हा अनुभव देणार आहे. चला तर आठवणींच्या या हिंदोळ्यावर. तर राजेबहादूर वाड्याच्या प्रा. शि. मंदिरमध्ये  पहिली ते चौथी 'फ' तुकडीत व्यतीत केल्यावर, मा. रा. सारडा कन्या विद्या मंदिरमध्ये परंपरेनुसार (तशी नाशिकला सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबामधील सगळ्याच मुलींचा हाच मार्ग असायचा) प्रवेश घेतला. मुजुमदारांच्या सर्व कन्या, म्हणजे माझ्या चार आत्या, बहिणी (सख्खी, चुलत वैगरे) ह्याच शाळेत शिकून मोठ्या झालेल्या.
थोडीशी विस्तृत माहिती देते इथे ,
नाशिकला प्रा शि मंदिर मध्ये बालवाडी ते चौथी मुलं मुली एकत्र शिकतात (co-ed school) पाचवी मध्ये मुले पेठे हायस्कूल मध्ये आणि मुली सारडा कन्या विद्या मंदिर मध्ये चौथी च्या प्रगती वर भरती होतात. ती शाळा पाचवी ते दहावी असते. सारडा शाळेत एकूण अ ते ह तुकड्या होत्या प्रत्येक इयत्तेत. गुणांच्या वर्गवारी वर ९०% पेक्षा जास्त मार्क्स मुली अ तुकडी, ८० ते ९० % ब तुकडी, ७५ ते ८० % क असा प्रवेश मिळतो. 
नवीन शाळा, नवीन वर्ग, नवीन विषय, नवीन मैत्रिणी, नवीन वेळ सकाळी सात पाच ते बारा वीस. पहिल्यांदाच प्रत्येक विषयाला वेगळ्या शिक्षिका, सगळंच नवीन नवीन, अगदी गणवेशसुद्धा!
चौथीपर्यंत 'फ' तुकडी. आणि आता एकदम प्रमोशन आणि पाचवी 'ब' कडे प्रस्थान. चौथी पर्यंत मनाली भार्गवे हीच एक मैत्रीण होती. तश्या बऱ्याच होत्या वर्गात, कविता, गायत्री, अनुपा, भारती, पण आम्ही दोघी नेहमी बरोबर पहिली ते चौथी आणि  सारडात तिला 'क' तुकडी मिळाली होती.
माझी बहीण माझ्याहून तीन वर्षांनी मोठी आणि पाचवीला 'अ' तुकडी मिळवलेली, आणि मला 'ब' तुकडी मिळाली ह्यावर घरात जरा अशांतताच होती. आणि हे रत्न काही चमकणारे नाही असा समज (आता त्यांना तो गैरसमज वाटतो)  झाला होता. तेव्हाही 'अ' तुकडीत एक दोन जागा रिकाम्या होत्या आणि जर पालक येऊन भेटले तर 'ब' मधून 'अ' मध्ये जाण्याची संधी होती. ती शितल वैद्यने मिळवली. आणि मनाली भार्गवेने पण निकम बाईंच्या ओळखीने!
आमचे बाबा शाळेच्या संस्थेचे (नाशिक एडुकेशन सोसायटी) वकील असूनही त्यांची तत्वे मध्ये आली आणि माझी 'ब' तुकडी दहावी पर्यंत चिकटली.
पहिल्याच दिवशी वर्ग शिक्षिकेचं नाव .....आग्नेस गुलाब भिंगारदिवे ऐकल्यावर माझ्या बालमनाला असंही नाव असतं का? असं झालं होतं. कारण चौथीपर्यंत एकतारे बाई, शिवदे बाई, पटवर्धन बाई, अशीच नावं ऐकली होती. पण हा ताण हलका मुख्याध्यापिका सुशिला परांजपे ह्यांनी केला होता. सेवा निवृत्तीच्या अगदी जवळ आलेल्या, पूर्ण पांढरे केस असलेल्या मोठया बाई. त्यांनी वर्गात येऊन आपली ओळख करून दिली/घेतली.  मला अजूनही आठवत आहे. मला त्या शिरा म्हणाल्या होत्या आणि साधना कट, गालावर हलकीशी खळी पडणाऱ्या गोंडस मेधाविनीला ससुल्या तर पदकू ला गुलाबजाम म्हणाल्या होत्या. वाड बाई इंग्रजी शिकवायला होत्या. स्लिव्हलेस चौकोनी गळ्याचा ब्लॉऊज, बॉयकट तेव्हा एकदमच ग्ल्यामरस वाटायच्या. त्यांनी शिकवलेले english आणि manners आत्ता हि खूप उपयोगी पडतात. 
आता तुम्ही मला अभ्यासू, हुशार वगैरे बरीच विशेषणे दिली आहेत. पण मला पाचवी ते सातवी अभ्यास अजिबात आवडत नव्हता. आणि मनामध्ये मी 'ब' तुकडीत म्हणजे काही फार विशेष ब्राईट नाही ही भावना होती. ह्या भावनेने मनात न्यूनगंड तयार केलेला.
नाही म्हणायला राष्ट्र भाषा सभा हिंदी परीक्षा आणि टिमव्ही च्या इंग्रजीच्या परीक्षा देऊन प्रमाणपत्र जमवत होते. बाकी चित्रकला, गायन, वादन, नृत्य सगळ्याचा आनंदच. कार्यानुभव त्यातल्या त्यात बरा म्हणायचा. अपूर्वा वैद्य तेव्हा तबला शिकायची मला ते फार भारी वाटायचं. स्वाती, ज्योती जुळ्या बहिणी असूनही किती वेगळ्या दिसायच्या, वागायच्या. चौथे अपत्य आणि फीचा संबंध त्यांच्यामुळेच कळला मला. क्षिप्राचे बाबा परदेशात होते. मस्कत की कुठेतरी, सगळं खूपच अचंबित करून टाकायचं.
काश्मीरा आणि काहीजणी रेखा ताईकडे कथ्थक शिकायला जायच्या. रागिणी गाणे शिकायची. नाही म्हणायला मी gymnastic लावले होते, यशवंत व्यायाम शाळेमध्ये. हळूहळू स्थिर होऊ लागलो.
क्रमश:


Comments

Popular posts from this blog

शाळा पुराण

Bosch Dishwasher Review and Buying guide

माझी आजी ..